
उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात तांत्रिक बिघाड झाल्याने डेहराडून बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात बिघाड झाल्यानंतर सुमारे तासभर विमान हवेतच घिरट्या घालत होते. यामुळे 170 प्रवाशांचे जीव मुठीत धरुन होते. डेहराडूनला येणाऱ्या दोन विमानांचे मार्ग वळवल्यानंतर ते विमान डेहराडून विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.
इंडिगोच्या विमानाने मंगळवारी सायंकाळी डेहराडून विमानतळावरून बंगळुरूसाठी नियमित वेळेत उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला. यानंतर सुमारे 53 मिनिटे विमान हवेतच घिरट्या घालत होते. तासाभरानंतर विमानाचे डेहराडून विमानतळावर पुन्हा उतरवण्यात आले आणि 170 प्रवाशांनी सुटकेता निःश्वास सोडला. या दरम्यान, डेहराडूनला येणाऱ्या दोन विमानांचे मार्ग वळवावे लागले. विमानतळ प्राधिकरणाच्या मते, दिल्ली-डेहराडून आणि मुंबई-डेहराडून या दोन विमानांना दिल्ली विमानतळावर वळवण्यात आले.



























































