सोशल मीडियावरून ‘मोदी का परिवार’ हटवा; पंतप्रधान मोदींची सूचना

लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमतमुक्त झाला आहे. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. आता भाजप मित्रपक्ष आणि एनडीए असे शब्द सातत्याने वापरत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून ‘मोदी का परिवार’ हे शब्द हटवण्याची सूचना पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना केली आहे. एक्सवर याबाबत त्यांनी पोस्ट केली आहे. राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘मोदी का परिवार’ नावाची मोहीम चालवली होती. या मोहिमेत पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाईलमध्ये ‘मोदी का परिवार’ असे लिहिले होते. लोकसभा निवडणूक संपली आहे. तसेच एनडीएच्या कुबड्यांच्या मदतीने नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ‘मोदी का परिवार’ हटवावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ‘मोदी का परिवार’ हे शब्द हटवण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या नेत्यांनी मोदी का परिवार असा प्रचार केला होता. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ असे लिहिले होते. ज्यांनी आपल्या प्रोफाईलसमोर असे लिहिले असेल ते आता त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ‘मोदी का परिवार’ हटवू शकतात, असे मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान,देशातील लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘मोदी का परिवार’ असे माझ्याबद्दलच्या त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून लिहिले होते. यामुळे मला खूप बळ मिळाले. आम्ही सर्व एक कुटुंब आहोत, हा संदेश प्रभावीपणे पोहोचवल्यानंतर, मी पुन्हा एकदा देशातील जनतेचे आभार मानतो आणि विनंती करतो की आता तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘मोदी का परिवार’ हे हटवू शकता. देशाच्या प्रगतीसाठी झटणारे कुटुंब म्हणून आमचे नाते मजबूत आणि अतूट आहे, असेही मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

या लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा खूप गाजला. तसेच भाजपकडून इतरांच्या कुटुंब आणि परिवाराबाबत खालच्या स्तराची टिकाटिप्पणी करण्यात आली होती. त्यावर अनेकांनी अंबानी, अदानी आणि काही उद्योगपती हेच मोदींचा परिवार आहे, अशी टीका केली होती. निवडणुकीत घराणेशाही आणि परिवादाचा मुद्दा उचलून धरत भाजपने मोदी का परिवार ही मोहीम चालवली. आता निवडणुका संपल्याने मोदी यांनी ‘मोदी का परिवार’ हटवण्याचे आवाहन केल्याची चर्चा आहे.