नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही; सात महिलांचा समावेश

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. मात्र, यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसल्याने त्यांचे सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर उभे आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मंत्रिमंडळात पहिल्यांदाच एकही मुस्लिम चेहरा नसल्यानेही याबाबत चर्चा होत आहे.

मोदी सरकारचे खातेवाटप झाले नसले तरी अमित शाह, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्याकडे जुनी खाती कायम राहण्याची शक्यता आहे. हे सरकार एनडीएच्या टेकूवर असल्याने मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांचे अनेक चेहरे आहेत. याआधी 2014 आणि 2019 मध्ये भाजपचे बहुमत असल्याने त्यांनी इतर पक्षांना मोठी मंत्रिपदे दिली नव्हती. तसेच मंत्रिमंडळात इतर पक्षांमधील केवळ तीन ते चारच चेहरे होते. मात्र यावेळी भाजपला केवळ 245 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपा मित्रपक्षांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मित्रपक्षातील अनेक चेहरेही मंत्रिमंडळात आहेत.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर सरकार अवलंबून आहे. त्यामुळे या दोन पक्षांनी केंद्र सरकारमध्ये मोठी खाती मागितली आहेत. त्यामुळे मोदी- शहा यांच्यासमोर पेच आहेत. तसेच मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही. या मंत्रिमंडळात केवळ पाच इतर अल्पसंख्याक चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. याचीही चर्चा होत आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्री आहेत. त्यात 30 कॅबिनेट मंत्री आहेत. तर पाच राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र कारभार आहे. उर्वरित 37 जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. या मंत्रिमंडळात पाच अल्पसंख्यांक मंत्री असले तरी त्यात एकही मुस्लिम चेहरा नाही. पाच अल्पसंख्याक मंत्र्यांमध्ये रवनीतसिंग बिट्टू (शीख), हरदीपसिंग पुरी (शीख), जॉर्ज कुरियन (ख्रिश्चन), किरेन रिजिजू (बौद्ध) आणि रामदास आठवले (बौद्ध) या पाच अल्पसंख्यांक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात एकूण सात महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील रक्षा खडसे यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.