केदारनाथला जाणाऱ्या भाविकांची संख्या घटली, हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाचा आणि प्रतिकूल हवामानाचा फटका

प्रतिकूल हवामान आणि हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाचा परिणाम केदारनाथ यात्रेवर झाला आहे. यात्रेच्या अकराव्या दिवशी मंगळवारी केदारनाथ धामला येणाऱ्यांची संख्या 2.43 लाखांवर पोहोचली. गेल्या वर्षी अवघ्या 10 दिवसांत 2.81 लाख भाविकांनी दर्शन केले होते. गेल्या पाच दिवसांत हेलिकॉप्टर, हॉटेल आणि जीएमव्हीएनचे (गढवाल मंडळ विकास निगम) अनेक बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. एकही अ‍ॅडव्हान्स बुकिंग उपलब्ध नाही. या सर्वांचा परिणाम तिथल्या मार्पेटवर झाला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भाविकांनी स्वतःहून त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली. अशी शेकडो बुकिंग मागील पाच दिवसांत रद्द झाली आहेत. जीएमव्हीएनच्या विश्रामगृहांचे बुकिंगदेखील रद्द करण्यात आले आहे. हॉटेल्स आणि
रेस्टॉरंट्सचे 20 टक्क्यांपेक्षा जास्त बुकिंग रद्द करण्यात आले.

2 मे रोजी सुरू झालेल्या यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच हवामानामुळे भाविकांना अडचणी आल्या. पाऊस आणि गारपिटीमुळे हेलिकॉप्टर सेवेवर परिणाम झाला. तिलवाडा, गुप्तकाशी, सोनप्रयाग आणि केदारनाथला अनेक बुकिंग रद्द झाले. श्री केदारनाथ हॉटेल असोसिएशनचे सचिव नितीन जमलोकी म्हणाले की, पूर्वी खूप कमी बुकिंग मिळत होत्या, परंतु आता एकामागून एक रद्द होत आहेत.

3 दिवसांत 259 हेलिकॉप्टरची बुकिंग रद्द

केदारनाथ यात्रेसाठी आठ कंपन्यांच्या नऊ हेलिकॉप्टर सेवा कार्यरत आहेत. नोडल अधिकारी राहुल चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मेपर्यंत 391 बुकिंग रद्द झाल्या. 7 मे रोजी सर्वाधिक 175 बुकिंग रद्द करण्यात आली. बुकिंग रद्द झाल्यामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाला. दररोज तीन-चार कॉल येत असून लोक परिस्थितीबद्दल विचारणा करत आहेत. बुकिंगचा फेरविचार करत असल्याचे हॉटेल व्यावसायिकाने सांगितले. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी युद्धवीर पुष्पवाण म्हणाले की, कपाट उघडण्याचा दिवस सोडला तर यात्रेतील भाविकांची संख्या नेहमीपेक्षा कमी होत आहे.

5 ते 10 मेपर्यंत रोज 6 ते 10 बुकिंग अशा 50 हून अधिक बुकिंग रद्द करण्यात आल्या. बाहेरील राज्यांमधून 30 पेक्षा जास्त बुकिंग रद्द झाली आहे.

घोडे-खेचरांना इक्वाइन इन्फ्लूएंजाची लागण झाल्याने पदयात्रा सर्वात जास्त प्रभावित झाली आहे. यात्रा सुरू झाल्यानंतर फक्त पहिले तीन दिवस घोडे आणि खेचर चालले. त्यासाठी आतापर्यंत 9,960 बुकिंग झाली आहे. दरम्यान, 14 खेचरांच्या मृत्यूनंतर 5 मेपासून ती सेवा बंद केली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.