
दिल्लीतील पालम परिसरात निवसी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी 6.45 वाजता आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालम कॉलनीतील गल्ली क्रमांक 2 मध्ये ही इमारत आहे. राजेंद्र कश्यप यांच्या मालकीची ही इमारत असून त्यांचे संपूर्ण कुटुंब तिथे राहते. कुटुंबात अंदाजे 15 सदस्य आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर एक ब्युटी पार्लर, बांगड्यांचे दुकान आणि इतर व्यवसाय आहेत. त्यांचे कुटुंब वरच्या मजल्यावर राहते.
सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी आग पाहिली आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. बाल्कनीमध्ये सहा ते सात लोक ओरडताना दिसले. पण आगीमुळे आत कुणी प्रवेश करू शकले नाही. अग्निशमन दलाच्या हायड्रॉलिक मशीनला उशीर झाल्याने अग्निशमन दलही अर्धा तास उशिरा पोहोचले. भाजलेल्या सहा ते सात जणांना वाचवण्यात आले असून इमारतीत 10 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एक मूल उंचीवरून पडून जखमी झाले, तर एक माणूस फायर एस्केपवरून घसरून खाली पडला. भाजलेल्या पाच ते सहा जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

























































