अस्थी विसर्जन करून परतत असताना काळाचा घाला, कार अपघातात दोन चिमुकल्यांसह 7 जणांचा मृत्यू

नातेवाईकांच्या अस्थी विसर्जन करून घरी परतत असताना वाटेतच काळाने घाला घातला. कार अनियंत्रित होऊन उलटल्याने अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ दाखल होत सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

जयपूरमधील वाटिका रिंग रोडवर रविवारी हा अपघात झाला. कारमध्ये दोन लहान मुलांसह सात जण होते. सर्वजण हरिद्वार येथे नातेवाईकाच्या अस्थीविसर्जन करण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असतानाच वाटिका रिंग रोडजवळ कार अनियंत्रित झाली आणि उलटली. या अपघातात कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला.

स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवले. पोलीस पुढील तपास करत आहेत. रामराज वैष्णव, मधु, रुद्र, कालूराम, सीमा, रोहित आणि गजराज अशी मयतांची नावे आहेत.