भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी काँग्रेसची स्तुती केली असून इंदिरा गांधी या ‘मदर ऑफ इंडिया’ आहेत, असेही ते म्हणाले. तसेच केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांचेही त्यांनी गोडवे गायले. काँग्रेस आणि डाव्यांची स्तुती केल्याने गोपी यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप, काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद आहेत. असे असतानाही सुरेश गोपी यांनी काँग्रेस, इंदिरा गांधी आणि करुणाकरन यांच्या केलेल्या स्तुतीमुळे त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सुरेश गोपी हे अभिनय क्षेत्रातून राजकारणात उतरले आहेत.
सुरेश गोपी केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आले. तसेच त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळाले. गोपी यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मदर ऑफ इंडिया म्हटले आहे. तसेच केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते के. करुणाकरण यांनाही त्यांनी उत्तम प्रशासक असल्याचे म्हटले आहे. करुणाकरण आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते ई. के. नयनार हे आपले राजकीय गुरू असल्याचेही गोपी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गोपी यांनी केरळच्या पुनकुन्नम येथील करुणाकरण यांच्या मुरली मंदिर या स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि डाव्या नेत्यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. मुरली मंदिराला भेट दिल्यानंतर या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, अशी विनंती त्यांनी केली. आपण येथे आपल्या गुरुला श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.