लोकसभा निवडणुकीत भाजपला जनतेने चांगलाच दणका दिला आहे. 400 पारच्या घोषणा देणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. त्यामुळे आता इतर पक्षांच्या एनडीएच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, भाजपला जनादेश नाही, त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करू नये, असे काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी भाजपला सुनावले आहे. यावेळी त्यांनी 35 वर्षांपूर्वीचा एक किस्साही सांगितला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला जनतेने नाकारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू नये, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन करण्याऐवजी भाजपने आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपने सरकार स्थापन करू नये, असे सांगत त्यांनी 35 वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगितला. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला सुमारे 200 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना सरकार बनवण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी आपल्याला जनादेश मिळाला नसल्याचे सांगून सरकार स्थापनेस नकार दिला. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास सांगितले होते. आता लोकसभेचे निकाल हे भाजप आणि एनडीएच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करु नये, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने विशेषत: विरोधकांना लक्ष्य केले. सीबीआय, ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा भाजपने गैरवापर केला. त्यांची ही सर्व कामे जनतेने नाकारल्याचे पायलट म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पार चा नारा दिला होता. मात्र, भाजपला 250 जागांही मिळाल्या नाहीत. त्यामुळे जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसून येत आहे.