
लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपसह एनडीएला चांगलाच दणका दिला आहे. आता जागा नेमक्या कशामुळे कमी झाल्या, यावर चर्चा होत आहे. मराराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे. याबाबत आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते सातत्याने संविधान बदलाबाबत विधाने करत होते, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला, असे स्पष्ट करत आठवले यांनी भाजपला कोपरखळी मारली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप पुन्हा सत्तेत आला तर संविधान बदलणार, अशी चर्चा सुरू होती. तसेच भाजपचे काही नेतेही संविधान बदलाची भाषा बोलत होते. त्यामुळे भाजपला जागांचा फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा इतर कुणीही देशाचे संविधान बदलू शकत नाही, असे आठवले यांनी ठणकावले. देशातील हिंदू-मुस्लिम वाद कमी व्हावा तसेच वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी समान नागरी कायद्याची गरज आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. तसेच सरकारी क्षेत्राचे खासगीकरण करू नये आणि केलेच तर तेथेही सर्व घटकांना नोकरीसाठी आरक्षण लागू करावे यांसह जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.