
शिवसेने पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली होती आणि अजित पवार यांनी भाजपसोबत जात पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले होते. या दोन्ही पक्षांतील फुट, पक्षाचे नाव आणि चिन्ह यासंदर्भात देशाच्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
एका मुलाखती दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावं, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनीच दिली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा नवं वळण पाहायला मिळणार आहे.
शरद पवार यांना ‘तुमच्या स्वतःच्या पक्षाचे भविष्य तुम्हाला कसे दिसते?’ असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा शरद पवार म्हणाले की आमच्या बाबतीत, पक्षात दोन मते आहेत. एक म्हणजे आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र यावे. दुसऱ्या गटाला वाटते, की आम्ही थेट किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसोबत जाऊ नये. त्यामुळे इंडिया आघाडीत सहभागी होऊन आघाडीची पुनर्रचना करावी.
इंडिया आघाडी सक्रीय नाही!
या उत्तरानंतर तुम्ही आधीच इंडिया आघाडीत आहात, असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांचे उत्तर आले की, ‘इंडिया आघाडी आज सक्रिय नाही. म्हणून आम्हाला आमच्या पक्षाची पुनर्रचना करावी लागेल, पुनर्बांधणी करावी लागेल, तरुणांना त्यात सहभागी करावे लागेल आणि काम करावे लागेल’.
पुढे ‘तुम्ही कुठे जायचा विचार करत आहात, इंडिया आघाडीसोबत की तुम्ही पर्याय खुले ठेवायचे आहेत?’ यावर शरद पवार म्हणाले की, ‘आमचा विचार विरोधी पक्षात काम करण्याचा आहे. आपण भाजपला एक विश्वासार्ह पर्याय निर्माण केला पाहिजे’.
केंद्रात विरोधी पक्षात बसायचे की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यावा लागेल, असेही पवार म्हणाले असल्याचे वृत्त खासगी वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळांवरून प्रसिद्ध करण्यात आले. त्याचसोबत एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावे असेही शरद पवार म्हणाले असल्याचे कळते.
पक्ष उभा करताना आज बाजूला गेले आहेत ते सगळे एकत्रच होते. सगळ्यांची विचारधारा एकच असल्याने भविष्यात जर सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असेही शरद पवार म्हणाले आहेत.
आमचे सगळे खासदार एक मताचे आहेत. आमच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते पण मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.
त्यामागे राजकीय कारण नव्हतं!
अलीकडेच अजित पवार आणि शरद पवार भेटल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्याच्या विविध बातम्याही झाल्याहोत्या. यासंदर्भात शरद पवार म्हणाले की ते राजकीय कारणासाठी नव्हते. शैक्षणिक संस्थांसह अनेक संस्था आहेत जिथे आम्ही त्यांच्यासोबत, एनडीएसोबत, डाव्या पक्षांसोबत काम करतो आणि आम्ही ते करत राहू.
त्यांना भूमिका घ्यावी लागेल!
सुप्रिया सुळेंबाबत प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, संसदेत विरोधी पक्षात बसायचे की नाही हे ठरवण्यासाठी त्यांना (सुप्रिया सुळे) भूमिका घ्यावी लागेल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खरोखर काय चूक झाली?
मला माहित नाही. येथील परिस्थिती आमच्या बाजूने होती. लोकसभा निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने लागला. तेव्हा विधानसभेतील (निवडणुकांमध्ये) काय झाले? आम्ही जिथे जातो तिथे प्रत्येक गावातील लोक म्हणतात की, आम्ही लोकसभा निवडणुकीत जसे मतदान केले होते तसेच विधानसभा निवडणुकीतही मतदान केले, पण निकाल वेगळा होता. मी निवडणूक आयोगाबद्दल कोणतेही कठोर विधान करु इच्छित नाही, असे शरद पवार म्हणाले.