नवी मुंबईकरांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड, पालिकेने राबवला देशातील पहिला उपक्रम

नवी मुंबईकरांना आपल्या मालमत्तेची अचूक माहिती मिळावी, मालमत्ता कर तत्काळ भरता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता ओळखपत्र तयार केले असून त्याचे वितरण आज स्वातंत्र्यदिनी सुरू करण्यात आले. नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देणारी नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांची महापालिकेशी संबंधित कामे सुलभतेने व्हावीत याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बारकाईने लक्ष दिले आहे. यादृष्टीने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेबाबतची सविस्तर माहिती देणारे ‘मालमत्ता ओळखपत्र’ उपलब्ध करून देण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ आज महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, सुनील पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहाय्यक आयुक्त अलका महापूरकर आदी उपस्थित होते. या मालमत्ता ओळखपत्राचा लाभ शहरातील साडेतीन लाख मालमत्ताधारकांना होणार असून त्यांना आपल्या मालमत्तेबाबतची मालमत्ता क्रमांक, पत्ता, क्षेत्रफळ, कर तपशील अशी सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी या कार्डद्वारे उपलब्ध होणार आहे.

ओळखपत्र म्हणूनही वापर करता येणार
या कार्ड स्वरूपातील ओळखपत्राद्वारे मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्ता कराची थकबाकी, आगाऊ भरलेली कर रक्कम सहजपणे पाहता येते तसेच हे ओळखपत्र घेऊन मालमत्ताधारक थेट नागरी सुविधा केंद्रावर जाऊन कर भरू शकतात. या मालमत्ता ओळखपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. आधारकार्डप्रमाणे हे मालमत्तेचे अधिकृत ओळखपत्र म्हणूनही वापरता येईल, असेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.