नवी मुंबईत निवाऱ्याच्या शोधात असलेल्या कुटुंबांसाठी मोठी खूशखबर; गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर सिडको फोडणार 900 घरांची हंडी

गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर येत्या 27 ऑगस्ट रोजी सिडको 900 घरांची हंडी फोडणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत घर घेण्यासाठी शोधाशोध करीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडकोच्या या लॉटरीमधील घरे तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर, कळंबोली, वास्तुविहार, स्वप्नपूर्ती, व्हॅलीशिल्प या प्रकल्पांमध्ये आहेत. या गृहनिर्माण योजनेतील घरे तयार असल्याने त्याचा ताबा विजेत्यांना सोडत निघल्यानंतर लगेच मिळणार आहे.

सर्वसामान्य कुटुंबांना नवी मुंबईत हक्काचा निवारा मिळावा यासाठी सिडकोने शहराच्या सर्वच नोडमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली आहे. अनेक ठिकाणी प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घरांचे गरजू कुटुंबांना वितरण करण्यासाठी सिडकोने प्रत्येक सणाचा मुहूर्त साधनू गृहनिर्माण योजना जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटिंग विभागाने 900 घरांची योजना तयार केली आहे. ही योजना येत्या 27 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये आर्थिक दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार आहे. योजनेची अधिकृत घोषणा झाल्यांनतर नागरिकांना सिडकोच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरण्यात येणार आहेत.

सुमारे 60 हजार घरांची निर्मिती

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील कुटुंबांना चांगली घरे रेल्वे स्थानक आणि बस स्थानकाच्या परिसरात उपलब्ध व्हावेत यासाठी सिडकोने सुमारे एक लाख घरे बांधण्याचा संकल्प केला होता. या योजनेतील सुमारे ६० हजार घरांची निर्मिती झालेली आहे. त्यापैकी बामण डोंगरी प्रकल्पातील पाच हजार घरांची सोडत काढण्यात आली. या घरांचे वितरण आता येत्या काही महिन्यांत विजेत्या अर्जदारांना होणार आहे. उलव्याच्या खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ सुमारे तीन हजार घरे बांधून तयार आहेत. याही घरांची सोडत काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

खासगी प्रकल्पातील घरांच्याकिमतीवर परिणाम

नवी मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना सिडकोच्या प्रकल्पातील घरे ३० लाख रुपयांच्या आसपास उपलब्ध होत आहेत. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पात घर घ्यायचे असल्यास नागरिकांना ५५ ते ६० लाख रुपये मोजावे लागतात. मात्र आता सिडकोने मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केल्यामुळे खासगी बिल्डरांनी बांधलेल्या घरांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. वन बीएचके घरांच्या चौकशीचे प्रमाण सर्वत्र कमी झाले आहे.

गरज आहे त्यालाच घर द्या!

सिडकोने घरांची सोडत काढण्याऐवजी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देऊन घरांची विक्री करावी. गरज आहे त्यालाच जर घर मिळाले तर सिडकोवर एकाच प्रकल्पाची पुनः पुन्हा लॉटरी काढण्याची वेळ येणार नाही. अनेक नागरिक क्षमता नसतानाही सिडकोच्या योजनेसाठी अर्ज करतात आणि विजेते ठरल्यानंतर घर परस्पर विकून टाकतात. ज्याला गरज आहे त्यालाच घर मिळाले तर अशा काळाबाजाराला आळा बसेल, अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक प्रकाश बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.