ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही शिंदे गटाला धक्का, शहर सहसंपर्कप्रमुखासह शेकडो पदाधिकारी शिवसेनेत

ठाणे शहरापाठोपाठ नवी मुंबईतही शिंदे गटाला आज जोरदार धक्का बसला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटाचे नवी मुंबई शहर सहसंपर्कप्रमुख शिरीष पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

लक्ष्मीदर्शन करून आलेल्या आयारामांची शिंदे गटात मनमानी सुरू झाली आहे. याबाबत नेत्यांचे लक्ष वेधूनही साधी दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेना वाढीसाठी झोकून देणार असल्याचे सांगत शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख शिरीष पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर, संदीप साळवे, पंकज मढवी, युवासेनेचे भाविक पाटील, भाजपचे संदीप मढवी, राष्ट्रवादीचे कृष्णा पाटील यांनी आज शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर, विठ्ठल मोरे, नवी मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख एम. के. मढवी, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभाप्रमुख अतुल कुळकर्णी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सुनील गव्हाणे, शत्रुघ्न पाटील, शहरप्रमुख विशाल ससाणे, कार्यालयप्रमुख एकनाथ दुखंडे, उपशहरप्रमुख अजय पवार आदी उपस्थित होते.

शिंदे गटाच्या तिसऱ्या शाखेलाही टाळे

आयारामांच्या मनमानीला कंटाळून शिंदे गटाच्या दोन शाखा पदाधिकाऱ्यांनी बंद करून एक दिवस उलटला नाही तोच आज पुन्हा तिसऱ्या शाखेलाही टाळे ठोकण्यात आले. सानपाडा गावात असलेली शिंदे गटाची शाखा बंद करण्यात आली. नवी मुंबईत लागोपाठ दोन दिवसांत शिंदे गटाच्या तीन शाखा बंद झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बंडाचे लोण संपूर्ण शहरात पांगू नये यासाठी ठाणेकरांच्या जिवाचा आटापिटा सुरू झाला आहे.