
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक लाख नवी मुंबईकरांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि मनसेला कौल दिला आहे. २८ प्रभागांमधून १११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ५ लाख ४२ हजार ७४ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यापैकी १ लाख २ हजार ३७३ मते शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांना मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेचे विशाल ससाणे, विशाल विचारे आणि मनसेचे अभिजित देसाई हे तीन उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना आणि मनसेला मिळालेला जनाधार पाहून सत्ताधाऱ्यांचे डोळे फिरले आहेत.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि मनसेने एकत्र लढवली. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अनेक दिग्गज शिंदे गट आणि भाजपमध्ये डेरेदाखल झाले. ही निवडणूक शिवसेना आणि मनसेने एकूण ९५ जागांवर लढवली. दिघ्यापासून ते बेलापूरपर्यंत शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी प्रस्थापितांना जोरदार टक्कर दिली. शिंदे गट आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे दोन्ही बाजूने मतदारांवर लक्ष्मी दर्शनाची अक्षरशः खैरात करण्यात आली. दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, नेरुळ, बेलापूरमध्ये पैशांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. मतदानाच्या या घोडे बाजारात २८ प्रभागांमध्ये सुमारे एक लाख मतदारांनी आपला कौल शिवसेना आणि मनसेला दिला
पुन्हा भरारी घेणार
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. सुमारे ११ ठिकाणी आमचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. स्वार्थ डोळ्यांसमोर ठेवून काही जण दुसऱ्या पक्षात गेले असले तरी मतदार मात्र आमच्यासोबत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत शिवसेना पुन्हा भरारी घेणार, असा विश्वास जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दगाफटका झाला
निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही जणांनी दगाफटका केला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी तोडली. त्यामुळे सर्वच जागांवर आम्हाला उमेदवार उभे करता आले नाहीत. जर त्यांनी आघाडी तोडली नसती तर चित्र वेगळे असते, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.



























































