
पाढे पाठ नसल्यामुळे एका निर्दयी शिक्षिकेने आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला उलथण्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार गोठिवली गावात घडली आहे. या विद्यार्थिनीच्या हातावर शिक्षिकेने वळ उठेपर्यंत ४० फटके मारल्याने तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. खासगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या या शिक्षिकेने क्षुल्लक कारणातून चिमुरडीला अमानुष शिक्षा दिल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चिमुरडीच्या पालकांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे.
घणसोली येथील गोठिवली गावात ही वादग्रस्त शिक्षिका खासगी शिकवणी वर्ग चालवते. याच शिकवणी वर्गात येणाऱ्या एका आठवीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने पाढे पाठ करण्यास सांगितले होते. मात्र या विद्यार्थिनीने पाढे पाठ केले नाही. त्यामुळे शिक्षिकेचा संताप अनावर झाला. तिने या चिमुरडीला स्वयंपाकघरात असलेल्या उलथण्याने सुमारे ४० फटके मारले. शिक्षिकेने हातावर इतके फटके मारल्यामुळे या चिमुरडीचा हात अक्षरशः काळानिळा झाला. ही विद्यार्थिनी घरी आल्यानंतर ती नाराज होती. सुरुवातीला तिने पालकांना काहीच सांगितले नाही. मात्र नंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने शिकवणी वर्गात घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट शिकवणी वर्ग गाठला आणि आपल्या मुलीला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला जाब विचारला. त्यावेळी या शिक्षिकेने पालकांबरोबर अरेरावीची भाषा केली.
पालक धास्तावले
विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून बेदम मारहाण केल्याच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात उघडकीस येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पालक धास्तावले आहेत. गोठिवली गावातील या शिक्षिकेने क्षुल्लक कारणावरून इतकी अमानुष शिक्षा विद्यार्थिनीला दिल्यानंतर संतप्त पालकांनी रबाळे पोलीस ठाणे गाठले आणि या निर्दयी शिक्षिकेच्या विरोधात तक्रार केली. या शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

























































