महायुतीचे नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला घाबरले आहेत. म्हणूनच भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 जागांवर ‘व्होट जिहाद’ झाल्याचे बोलत आहेत. ते घाबरले आहेत. त्यामुळे भाजप 60 जागांच्याही पुढे जाऊ शकत नसल्याचा हल्लाबोल आमदार रोहित पवार यांनी केला आहे. महापुरुष अभिवादन यात्रेनिमित्त आमदार रोहित पवार आज कोल्हापुरात आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी जे जे सर्व्हे केले, त्यातून राज्यात भाजप 60 जागांच्या पुढे जाऊ शकत नाही. तसेच महायुती 115 जागाही जिंकणार नाही, असा अंदाज आल्याने दिल्लीवरून आदेश आला असावा. त्यामुळे आता पर्याय शिल्लक राहिला नसल्याने, तुम्ही पूर्वीच्या स्टाईलने जावा, कुठेतरी हिंदू- मुस्लिम, ओबीसी-मराठा वाद निर्माण करा आणि त्यावर राजकीय पोळी भाजा, असा आदेश केंद्राकडून आला असेल म्हणूनच उपमुख्यमंत्री फडणवीस अशी वक्तव्ये करीत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. शिवाय महायुतीचे नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला घाबरले आहेत, म्हणूनच फडणवीस लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 जागांवर ‘व्होट जिहाद’ झाल्याचे बोलत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
आता गोमाता आठवली काय?
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी गोमातेला ‘राज्यमाता’चा दर्जा दिला आहे. या निर्णयाचे स्वागत; पण गाईचे खरे संगोपन शेतकरी करतात, दुष्काळाच्या काळात पाणी, चारा नव्हता. त्यावेळी दुष्काळग्रस्त भागात सरकारकडून चारा छावणी काढायला हवी होती; पण एकही छावणी काढली नाही. गोमाता अडचणीत असताना मदत नाही. आता सरकार अडचणीत असताना, त्यांना गोमाता आठवली, अशी टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली.
मुश्रीफ स्वार्थासाठी महायुतीसोबत गेले
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वेळोवेळी गुरुदक्षिणा दिल्याचा उल्लेख करीत असल्याकडे लक्ष वेधले असता, एखादा गुरू चांगल्या विचाराचा आणि विचारांशी लढणारा असेल, महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी तो लढला असेल तर अशा गुरूला गुरुदक्षिणा विचार करून द्यायला हवी. पण दुर्दैवाने शिष्य म्हणविणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ते विचार जपले नाहीत. विचार जपणे, लोकांसाठी काम करणे हे हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांना जमले नाही. म्हणूनच ते स्वार्थासाठी महायुतीसोबत गेल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली.