स्वाभिमान विकलेल्या गावगुंडांना पाठवून राडा करणं फडणवीसांना शोभत नाही; मालवणमधील राड्यावरून रोहित पवारांचा हल्लाबोल

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींसह राज्यभर संताप आहे. या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज मोर्चाचे आयोजन केले होते. पण राणे समर्थकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. सरकारचा भ्रष्टाचार उघडा होऊ नये म्हणून भाजप नेत्यांना तसेच स्वाभिमान विकलेल्या गावगुंडांना पाठवून राडा करणे देवेंद्र फडणवीस यांना शोभत नसल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या कामात दलाली खाल्ल्याने महाराजांचा पुतळा कोसळला ही वस्तुस्थिती आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते पाहणी करायला गेले असता सरकारचा भ्रष्टाचार उघडा होऊ नये म्हणून भाजप नेत्यांना तसेच स्वाभिमान विकलेल्या गावगुंडांना पाठवून राडा करणे देवेंद्र फडणवीस यांना शोभत नाही. सागर बंगल्याच्या संरक्षणामुळे पत्रकारांचे माईक हिसकावण्यापासून पोलीस अधिकाऱ्यांना अरेरावी करण्यापर्यंत मजल जायला लागली आहे, हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची गुलामगिरी करणाऱ्या गावगुंडांचा रोहीत पवार यांनी जाहीर निषेध केला आहे.