मुंबईत अग्निशमन दलाच्या साथीला ‘एनडीआरएफ’चे पथक, दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करणार

जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच मुंबईत पाऊस दाखल होणार असल्यामुळे पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. दरड पडणे, इमारती दुर्घटना यासारख्या घटनांमध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी मुंबई अग्निशमन दलाबरोबरच एनडीआरएफचे पथक मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये तैनात ठेवण्यात येणार आहे. या पथकाला घटनास्थळी वेगाने पोहोचण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ग्रीन का@रिडॉर तयार करून देण्यात येणार आहे.

पालिका मुख्यालयात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. यात पावसाळापूर्व कामांचा सर्व यंत्रणांनी आढावा बैठक, संयुक्त भेटी आणि प्रसंगी सर्वेक्षण करून निर्णय घेण्याचे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिले. पालिका मुख्यालयात आज झालेल्या बैठकीला महापालिकेच्या विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी, मध्य व पश्चिम रेल्वे, हवामान खाते, तटरक्षक दल, नौसेना, एनडीआरएफ, वाहतूक पोलीस, म्हाडा, एसआरए, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए, बेस्ट, टाटा पॉवर, अदानी एनर्जीच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. बैठकीत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

मॅनहोलच्या झाकणांवर लक्ष ठेवा!

पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटनांमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, या अनुषंगाने उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत समन्वय साधून पंप आणि डिझेल जनरेटर संच बसवण्याचे नियोजन करावे तसेच मॅनहोलची झाकणे खुली राहणार नाहीत, यासाठीची खबरदारी घेण्याचे निर्देश डॉ. शर्मा यांनी दिले.

… तर परवाना रद्द

मुंबईत विविध प्राधिकरणांच्या अखत्यारितील जागेवर जाहिरात फलक आहेत. हे जाहिरात फलक सुस्थितीत असल्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक स्थैर्य) प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची खात्री करावी. ज्या फलकांसाठीचे संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही, अशा फलकांचा परवाना रद्द करावा, असे निर्देश शर्मा यांनी दिले तसेच मोबाईल टॉवरच्या अनुषंगानेही संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.