
घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात गर्दुल्ल्यांकडून दोन महिला सुरक्षारक्षकांना मारहाण झाल्याची घटना काल घडली होती. या रुग्णालयात ताबडतोब पुरुष सुरक्षा रक्षकांची नेमणूक न झाल्यास राजावाडी रुग्णालयात काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला.
राजावाडी रुग्णालयामधील दोन महिला सुरक्षारक्षकांना काल गर्दुल्ल्यांनी फरशीच्या सहाय्याने मारहाण केली होती. यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. या रुग्णालयाच्या आवारात गर्दुल्ले आणि काही समाजपंटकांचा सुळसुळाट आहे. स्थानिक पोलिस स्टेशन त्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच या रुग्णालयात महिला सुरक्षा रक्षकांची संख्या जास्त असून पुरुष सुरक्षा रक्षकांची कमतरता असल्याने अशाप्रकारचे हल्ले होतात. महिला सुरक्षा रक्षकांवर झालेल्या हल्यावेळी तेथे पोलिस हजर होते. परंतु त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. या प्रकाराची गंभीर चौकशी व्हावी तसेच रुग्णालयात महापालिकेने ताबडतोब पुरुष सुरक्षा रक्षक घ्यावेत व पुढील आठ दिवसात पुरुष सुरक्षा रक्षकांची नियुक्ती न झाल्यास राजावाडी रुग्णालयात काम बंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती यांना व प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांना दिला.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी रंजना नेवाळकर, अजय राऊत, संदिप तांबे, रामचंद्र लिंबारे, मारुती साळवी, प्रकाश वाणी, प्रज्ञा सकपाळ, अजित गुजर, अजित भायजे, सचिन भांगे, विजय चपटे, विशाल चावक, सुनील भोसतेकर, मयुरेश नामदास, लोकेश फेफरे, प्रसाद कामतेकर, श्रध्दा नाटेकर, शपुंतला शिंदे, क्रांती मोहिते, पुनम परब, नंदा काळे, चंद्रकांत हळदणकर, सचिन पाटील आदी उपस्थित होते.