नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाई यांना विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार विधिमंडळ परिसरात घडला. नीलम गोऱ्हे यांच्यासमोर हा प्रकार घडला. यामुळे वरुण सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला. यामुळे विधिमंडळ परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गुरुवारी दुपारच्या सुमारास विधिमंडळ परिसरात नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केली. धक्कादायक म्हणजे असा प्रकार फक्त एकदाच नाही तर दोन वेळा घडला. दुसऱ्यांदा आपल्याला धक्का लागल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला.

जर कुणी आम्हाला ओळखत नसेल, तर या आवारात आम्ही आमदार आहोत हे ओळखू यावे म्हणून बिल्ले लावतो. म्हणजे काय उपसभापतींसाठी वेगळी बस काढा, त्यांच्यासाठी वेगळे विमान विधान भवनाच्या टेरेसवर उतरवा. हे दुसऱ्यांदा घडले. पहिल्यांदा घडले तेव्हा मी काही बोललो नाही. यांच्यासोबत कुणीही येतात आणि आमदारांना धक्के देतात, हे प्रकार बंद झाले पाहिजे, असे वरुण सरदेसाई माध्यमांशी बोलताना म्हटले.

गेल्या वेळी पायऱ्यांवर उभा असताना सुरक्षा रक्षकाने बाजुला करण्याचा प्रयत्न केलेला. आमदार आहोत हे ओळखू यावे म्हणूनच बिल्ले लावतो. ते पाहून तरी आमदारांना जायला जागा द्या, असेही वरुण सरदेसाई म्हणाले.