तो आला… त्यानं पाहिलं… अन् मैदान मारलं ! हिंदुस्थानच्या नीरज चोप्राची थाटातच फायनलमध्ये एण्ट्री

<<< मंगेश वरवडेकर

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या गतविजेत्या नीरज चोप्राने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत ऑलिम्पिक मोहिमेचा मंगळवारी धडाकेबाज प्रारंभ केला. टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता हिंदुस्थानी खेळाडू त्याच थाटात आला. त्यानं पाहिलं… आणि एका प्रयत्नात मैदान मारलं. नीरजने ‘ब’ गटाच्या पात्रता फेरीत सर्वाधिक 89.34 मीटर भालाफेक करीत आपण यंदाही सुवर्णपदक राखणार असा इशाराच जणू प्रतिस्पर्धी खेळाडूंना दिलाय.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीच्या पात्रता फेरीत

क्रीडाविश्वातील 32 खेळाडूंनी आपले काwशल्य पणाला लावले. 16-16 खेळाडूंचे दोन गट करण्यात आले होते. ‘अ’ आणि ‘ब’ या दोन्ही गटातून 84 मीटरच्या पुढे भालाफेक करणारे नऊ खेळाडू फायनलसाठी थेट पात्र ठरले, तर उर्वरित तीन अव्वल खेळाडूंनाही अंतिम फेरीत खेळण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे 8 ऑगस्टला होणाऱया अंतिम फेरीत 12 भालाफेकपटू तीन पदकांसाठी मैदानावर जिवाचे रान करताना दिसतील. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भालाफेक करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरून इतिहास घडविला होता. आता त्याला ऑलिम्पिकचे सलग दुसरे सुवर्णपदक खुणावत आहे.

पात्रता फेरीत नीरजचेच वर्चस्व

‘ब’ गटात नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भालाफेक करीत पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळविली. त्याची ही कामगिरी दोन्ही गटातूत अव्वल ठरली. त्याचा देशसहकारी किशोर जेना हा 80.73 मीटर भालाफेक करीत गटातून नवव्या स्थानी राहिला, मात्र वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करूनही तो अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाद झाला. ‘ब’ गटातून नीरज चोप्रासह ग्रेनाडाचा ए. पीटर्स, पाकिस्तानचा अर्शद नदीम व ब्राझीलचा लुइझ मॉरिसिओ डा सिल्वा हेदेखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.