NEET परीक्षेत झालेल्या गैरव्यवहरामुळे देशभरातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यामातून परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी या मागणीसाठी नांदेड शहरात आज (14 जून) भाग्यनगर येथे हजारो विद्यार्थ्यांनी एल्गार मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवदेन सादर केले.
दरवर्षी नीट परीक्षेला देशभारातून 24 ते 25 लाख विद्यार्थी बसतात. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करत असतात. मुलाला डॉक्टर करण्यासाठी पालक आपली जमा असलेली तुटपुंजी खर्च करतात. परंतू केंद्र सरकारकडून विशिष्ट संस्थेतील विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येत असेल तर या परिक्षा घ्यायच्या कशाला असा सवाल पालक विचारत आहेत. ग्रेसच्या नावाखाली पैकीच्या पैकी मार्ग देऊन देशातील 67 विद्यार्थी 720 पैकी 720 गुणांनी उत्तीर्ण झाले. आजपर्यंत नीट परीक्षेच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडला. त्यामुळे नीट परीक्षेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जात आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने घ्यावी, केंद्र सरकारने या बाबतीत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी आणि यातील दोषींविरुद्ध कठोर कारवाही करण्यात यावी, अशी मागणी आज नांदेडमध्ये काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चातून विद्यार्थ्यांनी केली.
नांदेडमधील भाग्यनगर येथून हा मोर्चाला सुरुवात झाली आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन सादर केले. हजारो विद्यार्थी यावेळी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये युवक काँग्रेसचे बालाजी गाडे, पीटीए संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा.आर.बी.जाधव, पीटीए संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज अटाकोरे, सीसीटीएफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. नागेश कल्याणकर, उपाध्यक्ष साईकिरण सलगरे, आयआयबीचे बालाजी पाटील, केदार पाटील सोळुंके, अब्दुल बाखी, विश्वास कदव यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.