नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय

देशपातळीवर 15 जूनला आयोजित केलेली नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा दोन सत्रांऐवजी एकाच सत्रात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परीक्षा केंद्रे वाढवणे व इतर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ही परीक्षा लांबणीवर टाकली आहे.

नीट पीजी ही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षा मानली जाते. या परीक्षेतील गुण वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी वापरले जातात. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जात होती. त्याचा निकालावर परिणाम होत होता. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्देशाला अनुसरून वैद्यकीय शास्त्राच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नीट पीजी परीक्षा एकाच सत्रात घेणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. याची अंमलबजावणी करण्यासाठी 15 जूनची परीक्षा पुढे ढकलली आहे.

नवी तारीख लवकरच जाहीर करणार

परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. एकाच सत्रात परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रांची संख्या वाढवणे, सर्व उमेदवारांना एकाच वेळी सामावून घेण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवणे आदी गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने स्पष्ट केले.