नेपाळ, ओमान टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र, दोन्ही संघ तिसऱ्यांदा खेळणार वर्ल्ड कप

आशिया-ईएपी पात्रता फेरीतील ‘सुपर सिक्स’ सामन्याआधीच नेपाळ आणि ओमान या देशांनी आगामी वर्षी होणाऱया टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे तिकीट बुक केले. या स्पर्धेतून आणखी एक संघ टी-20 वर्ल्ड कपला पात्र ठरणार आहे.

हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने या टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे. यूएईने सामोआवर 77 धावांनी विजय मिळवल्यानंतर नेपाळ आणि ओमान या दोन्ही संघांचे विश्वचषकातील स्थान निश्चित झाले. सध्या यूएई सुपर सिक्स गुणतालिकेत चार गुणांसह तिसर्या स्थानी आहे, तर नेपाळ आणि ओमान या दोघांचे गुण समान असून नेट रन रेटच्या आधारे त्यांचे स्थान ठरले आहे. यूएईचा पुढचा सामना 16 ऑक्टोबरला जपानविरुद्ध होणार आहे.

नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने संघाच्या यशात निर्णायक ठरला आहे. त्याने चार डावांत 10 बळी घेतले असून त्याची सरासरी फक्त 9.40 आणि इकोनॉमी रेट सहाच्या आत आहे. कतारविरुद्धच्या सामन्यात त्याने 5/18 अशी भेदक कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला 148 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना 142 धावांवर गारद केले. ओमानचा डावखुरा वेगवान गोलंदाज जितेन रमणंदीही प्रभावी ठरला असून त्याने चार डावांत 7 बळी घेतले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 5.90 इतका आहे. आशिया कपदरम्यान त्याने हिंदुस्थानविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी करत अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांना बाद केले होते.