
इस्रायलला कर्करोग आणि मानवतेवरील शाप असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संबोधले. त्यानंतर बेंजामिन नेतान्याहू यांनी या वक्तव्यावर अतिशय कडक शब्दात इशारा दिला होता. आगामी ‘इस्लामाबाद संवादा’च्या पार्श्वभूमीवर इस्रायलविरोधात वादग्रस्त वक्तव्ये केल्याबद्दल पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाकडून तीव्र शब्दांत ताकीद मिळाल्यानंतर, आसिफ यांना त्यांच्या ‘एक्स’ हँडलवरून इस्रायलविरोधी पोस्ट्स हटवण्यास भाग पाडले गेले आहे.
या घटनेकडे पाकिस्तानने केलेली राजनैतिक शरणागती म्हणून पाहिले जात आहे. आपल्या एका पोस्टमध्ये संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलला ‘मानवतेवरील शाप’ म्हटले होते. या वक्तव्यावर इस्रायलने तीव्र भूमिका घेतली होती. बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने या वक्तव्यांना ‘अपमानकारक’ म्हटले. तसेच अशी भाषा सहन केली जाऊ शकत नाही, विशेषतः अशा देशाकडून जो सध्याच्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये स्वतःला तटस्थ मध्यस्थ म्हणून सादर करत आहे.
आज तक ने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता प्रस्थापित करणारा सर्वात मोठा देश म्हणून जगासमोर स्वतःला सादर करत आहे. तथापि, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एका विषारी वक्तव्याने ही संपूर्ण योजना हाणून पाडली आहे. इस्रायलला कर्करोग आणि मानवतेवरील शाप संबोधून आसिफ यांनी अशी नामुष्की ओढवून घेतली आहे की इस्रायलच्या पंतप्रधानांनी आता त्यांच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.



























































