लॉकडाऊनमुळे वैतागलेल्या नागरिकांचा तुफान हिंसाचार, दंगलीमुळे नेदरलँडमध्ये तणाव

Photo courtsey- Twitter

इंग्लंड, जर्मनी यासारख्या देशांप्रमाणेच युरोपातील नेदरलँडमध्येही कोरोना अजून आटोक्यात आलेला नाही. तिथे कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून तिथले लोकं या निर्बंधांना वैतागले आहेत. मंगळवारी नेदरलँडमधील विविध शहरात नागरीक रस्त्यावर उतरले होते. यामध्ये तरुणांची संख्या जास्त होती.

Photo courtsey- Twitter
Photo courtsey- Twitter

या हिंसक जमावाने वाटेत येईल त्याची नासधूस करत जाळपोळ केली. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांसोबत त्यांची झटापटही झाली. राजधानी एम्सटरडॅमसह रॉटरडॅम, एमर्सफूर्ट, गिलान या शहरांमध्ये मंगळवारी दंगे भडकल्याचं कळतं आहे. या दंगलींप्रकरणी पोलिसांनी देशभरात 150 जणांची धरपकड केली आहे.

Photo courtsey- Twitter
Photo courtsey- Twitter

रॉटरडॅममध्ये पोलिसांना दंगेखोरांवर पाण्याचा मारा करावा लागला. तिथली परिस्थिती पाहाता शहराचे आयुक्त अहमद आबूतालेब यांनी पोलिसांना दंगेखोरांना अटक करण्यासाठी अधिकचे अधिकार प्रदान केले आहेत. दंगेखोरांनी तातडीने रस्ते रिकामे करावेत असं आवाहनही आयुक्तांनी केलं आहे. सोमवारपासूनच या दंगलींना सुरुवात झाली होती. यामागचे क्षणिक कारण काय होतं हे अजून कळू शकलेलं नाहीये. नेदरलँडमध्ये लॉकडाऊन शिथील करण्याऐवजी तो दिवसेंदिवस कडक होत चालला आहे. यामुळे वैतागल्याने लोकं रस्त्यावर उतरायला लागली असून त्यांनी तोडफोडीचा मार्ग स्वीकारला आहे. या तोडफोडीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Photo courtsey- Twitter
Photo courtsey- Twitter

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर नेदरलँडमध्ये देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. नव्या कोरोनाचा धोका अधिक असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यात आले होते. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत असल्याने लॉकडाऊन शिथील करावा अशी मागणी तिथल्या जनतेकडून केली जात आहे. तिथल्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही गेल्या 40 वर्षातील भयानक दंगल आहे. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुत्त यांनी या दंगलींमध्ये झालेल्या जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाचा निषेध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या