
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) शाळांमध्ये मुलांचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम संपूर्ण देशभरात राबवण्याची योजना असून पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सात कोटी मुलांचा बायोमेट्रिक डेटा म्हणजेच बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्पॅनिंग आणि फोटो आधारमध्ये अपडेट केले जाणार आहे. हे संपूर्ण काम पालकांच्या संमतीने शाळांमध्ये केले जाईल. ही मोहीम येत्या दोन महिन्यांत सुरू करण्यात येईल. पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमेट्रिक्सशिवाय आधार बनवले जाते.
पाच वर्षांनंतर बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्पॅनिंग आणि फोटो अपडेट करणे आवश्यक आहे. जर हे केले नाही तर आधार निष्क्रिय होऊ शकते. यामुळे शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती किंवा सरकारी योजनांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. यूआयडीएआय प्रत्येक जिह्यात बायोमेट्रिक मशीन पाठवेल, जे शाळेत जाऊन मुलांचा डेटा अपडेट करतील. पालकांच्या संमतीने हे काम केले जाणार आहे.
आधार अपडेट फ्री
शाळांमध्ये केले जाणारे पाच ते सात वर्षे वयोगटातील मुलांसाठी आधार अपडेट मोफत आहे. जर मूल सात वर्षांपेक्षा मोठे असेल तर 100 रुपये शुल्क भरावे लागेल. वेळेवर अपडेट न केल्यास आधार निष्क्रिय होऊ शकतो, ज्यामुळे अनेक सुविधा बंद होऊ शकतात. अपडेटेड आधारमुळे विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, परीक्षा नोंदणी आणि सरकारी योजनांचे फायदे सहज मिळण्यास मदत मिळू शकते.