
पंजाबमधील सरकारी शाळेत उद्या 1 एप्रिल 2026 पासून नवीन सुविधा लागू केली जाणार आहे. एखाद्या मुलाने शाळेला दांडी मारली तर मुलगा शाळेत न आल्याची माहिती त्याच्या पालकांना एसएमएसद्वारे दिली जाईल. तसेच शाळेत कोणता शिक्षक गैरहजर राहणार आहे याचीही माहिती पालकांना दिली जाणार आहे. हे सर्व करण्याचा उद्देश म्हणजे, शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे आणि शिक्षण अधिक मजबूत करणे आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.
नव्या व्यवस्थेअंतर्गत शाळा उघडल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असेल. जो विद्यार्थी अनुपस्थित असेल त्याला मार्क केले जाईल. मार्क करताच त्या मुलाच्या आई-वडिलांना मोबाईलवर एसएमएस पोहोचेल. जर एखादा विद्यार्थी दोन दिवस शाळेला आला नाही तर शाळेतील कर्मचारी कुटुंबाला पह्न करून अनुपस्थितीचे कारण विचारतील. यासाठी ई-पंजाब पोर्टलवर नवीन हजेरी मॉडय़ुल जोडले आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया रियल टाइममध्ये दिसेल. या व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या अनुपस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. एखादा शिक्षक अनुपस्थित असेल तर त्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली जाईल. यामुळे शाळा आणि पालक यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल. या नव्या व्यवस्थेची माहिती राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या पालक-शिक्षक बैठकीत दिली आहे. या बैठकीत 18 लाखांहून अधिक पालकांनी सहभाग घेतला होता.





















































