‘कुणी गोविंद घ्या…?’ नाटक रंगभूमीवर…

नाटकाचे शीर्षक लक्षवेधी असले की त्या नाटकात नक्की काय असणार याची उत्सुकता वाढते. असेच एक शीर्षक असलेले ‘कुणी गोविंद घ्या…?’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे. विशेष म्हणजे, ताज्या दमाचे काही युवा कलावंत हे नाटक रंगभूमीवर सादर करत आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग अलीकडेच ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पार पडला.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधला संवाद संपुष्टात येत चालला आहे. नात्यांमध्ये पारदर्शकता नसेल तर काय घडू शकते, याचा ऊहापोह या नाटकात करण्यात आला आहे. ‘यशवंत क्रिएशन’ आणि ‘अर्चना थिएटर्स’ या संस्थांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. मोनाली तांगडी, शेखर दाते व दुर्वा सावंत हे नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दीपेश सावंत याने केले आहे. प्रसाद रावराणे, सिद्धेश नलावडे आणि विभूती सावंत असे युवा कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. उदयराज तांगडी हे नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत.

नात्यांमध्ये कितीही मतभेद असले तरी संवाद साधण्याने प्रश्न सुटतात. आपण नात्यांमध्ये एकमेकांना गृहीत धरतो. स्वतःच वेगवेगळय़ा कल्पना करून घेतो, पण एकमेकांशी बोलण्याने समस्या नक्कीच सुटतात. हा विषय तसा गंभीर असला तरी या नाटकात मात्र तो विनोदी पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे नाटकाचा युवा लेखक, दिग्दर्शक दीपेश सावंत याने सांगितले.