राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश देण्यासाठी ‘एक राज्य एक गणवेश’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आज नवा जीआर जारी केला आहे. मात्र यात मागील धोरणातील निर्णय बदलण्यात आल्याने संभ्रम वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
नवीन आदेशाप्रमाणे आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी नियमित गणवेश निश्चित करण्यात आला असून तर उर्वरित दिवशी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी स्काऊट आणि गाईडचे गणवेश घालायचे आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत गणवेशावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर शाळा सुरू होण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी उरलेला असताना आलेल्या या शासन निर्णयामुळे शिक्षणतज्ञांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
- पहिली ते चौथीच्या मुलींना नियमित गणवेशामध्ये आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळय़ा रंगाचा पिनो फ्रॉक आणि स्काऊट गाईडप्रमाणे गडद निळय़ा रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक असेल.
- सहावी ते आठवीच्या उर्दू माध्यमातील मुलींना आकाशी निळय़ा रंगाची कमीज, निळय़ा गडद रंगाची सलवार व गडद निळय़ा रंगाची ओढणी असेल. तर स्काऊट आणि गाईडसाठी गडद आकाशी निळय़ा रंगाची कमीज, सलवार, गडद निळय़ा रंगाची ओढणी असेल.
- पहिली ते आठवीतील मुलांना आकाशी रंगाचा शर्ट हाफ पँट आणि फुल पँट आणि स्काऊटसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळय़ा रंगाची फुल पँट असेल.