मुंबई मार्गावर पहिल्यांदा 20 डब्यांची ‘वंदे भारत’ ट्रेनची चाचणी घेण्यात आली. 20 डबे असलेली नवीन सेमी हायस्पीड ट्रेन कालूपूर रेल्वे स्टेशनहून रवाना झाली. ही ट्रेन 130 किलोमीटर प्रतितास वेगाने धावली. अहमदाबाद-वडोदरा-सुरत मार्गावर या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. वंदे भारत ट्रेन देशातील प्रमुख शहरात धावत आहेत. परंतु या सर्व ट्रेन 16 कोचच्या आहेत. तसेच काही छोटय़ा शहरात धावणाऱया ट्रेन 8 कोचच्या आहेत. सध्या अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान 16 कोचच्या दोन ट्रेन सुरू आहेत.
ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर देशात पहिल्यांदा 20 कोचची वंदे भारत धावताना दिसणार आहे. ही ट्रेन 20 कोच सोबत 130 किलोमीटर प्रति तास वेगाने धावली. या ट्रेनमध्ये 14 सी प्लस 2 ई कोचसह 4 अतिरिक्त सी कोच जोडले आहेत. भरधाव वेगाने धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अहमदाबाद – मुंबई दरम्यान रेल्वे क्रॉसिंग आणि स्टेशनवर आरपीएफ कर्मचाऱयांना तैनात करण्यात आले आहे.