
ग्रेटर नोएडा येथे रस्त्यावरचे मोमोज खाल्ल्याने एकाच कुटुंबातील नऊ लोकांची प्रकृती बिघडली. पोटदुखी, उल्टी आणि अशक्तपणा आल्याने या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिह्यातील दादरी परिसरात ही घटना घडली आहे. सायंकाळी एका दुकानातील मोमोज खाल्ल्याने या सर्वांना अन्नबाधा झाली. मोमोज खाल्ल्यानंतर या सर्वांना उलट्या झाल्या. पोटदुखी आणि ताप आल्याने या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या दुकानातून मोमोज आणले होते, त्या मोमोजचा नमुना तपासण्यासाठी लॅबला पाठवण्यात आला आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर या सर्वांना रुग्णालयातून सोडण्यात आले. अन्न विषबाधेचे लक्षण दिसले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.





























































