
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नऊजणांची 91 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल बाबासाहेब बंड या आरोपीला अटक केली आहे, तर इतर दोनजण फरारी आहेत.
तोंडोळी गावचे सरपंच नंदकिशोर शिवाजी वारंगुळे यांना या घटनेतील आरोपी अनिल आबासाहेब बंड यांनी माझा भाचा श्रेयस जयराम गरड व पुतण्या रोहीत दादासाहेब बंड व आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व्यवसाय करीत आहोत. बोधेगाव व कोरडगाव येथे कार्यालय सुरू केल्याचेही सांगितले. तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 17 टक्क्यांहून अधिक व्याजदर व सहा महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. यानंतर वारंगुळे यांनी 24 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. काही दिवसांनंतर वारंगुळे यांनी रक्कम परत मागितली असता, आरोपींनी केवळ 5 लाख रुपये दिले. उर्वरित 19 लाख 50 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर सर्वच आरोपी फरार झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
या आरोपींकडे विविध गावांत राहणारे बद्रीनारायण मुखेकर (26 लाख), शिवाजी पोपळे (5 लाख), पोपट भाऊसाहेब जाधव (2 लाख), योगेश चितळे (1 लाख 50 हजार), सोमनाथ कारभारी घनवट (5 लाख), यागेश घनवट (2 लाख), भीमराज पवार (2 लाख), विजय मुखेकर (28 लाख) अशी गुंतवणूक केली असून, या प्रकरणात एकूण 91 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी वारंगुळे यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अनिल आबासाहेब बंड (रा. कोरडगाव) याला अटक केली आहे. रोहीत दादासाहेब बंड (कोरडगाव) व श्रेयस जयराम गरड (बालमटाकळी) हे दोघे फरारी आहेत.

























































