
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील नऊ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. या नऊ शिक्षकांची घोषणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. २७ प्रस्तावातून ९ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
शिक्षक दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करते. आज पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांची नावे जाहीर केली.त्यामध्ये मंडणगड- संजय करावडे पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बामणघर, दापोली- जावेद मैनोद्दीन शेख उपशिक्षक, जिल्हा परिषद आदर्श शाळा वाकवली क्र.१,खेड- एकनाथ आनंदराव पाटील पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सवेणी क्र.१,चिपळूण- नरेश सदाशिव मोरे पदवीधर शिक्षक, पाग मुलांची शाळा, गुहागर- चंद्रकांत राजाराम बेलेकर उपशिक्षक,जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा जानवळे क्र.१,संगमेश्वर- विनय होडे पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा हातीव क्र.१,रत्नागिरी- प्रदीप शांताराम जाधव पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा भोके आंबेकरवाडी. लांजा- नितीन हरिश्चंद्र शेंडगे, उपशिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वाकेड क्र.१, राजापूर- सुहास यशवंत काडगे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक गोखले कन्याशाळा राजापूर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले. सध्या गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने पुरस्कार वितरणाची वेळ व तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे वैदही रानडे यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार उपस्थित होते.