अधोरेखित – विठ्ठलाच्या चरणी…

>>सिद्धार्थ म्हात्रे

पुस्तक वाचताना… मनापासून वाचताना… अगदी पहिल्या पानापासून वाचताना… नव्या कागदाचा कोरा करकरीत स्पर्श अनुभवताना… मुखपृष्ठ न्याहाळताना अन् पुढे तिची अर्पणपत्रिका धुंडाळताना… वाचलेलं मनाच्या तळाशी अधोरेखित होत जातं. अशाच काही रुतलेल्या, रुजलेल्या अर्पणपत्रिका. या सदरातून वाचकांच्या भेटीस.

एखादं पुस्तक सहज हाती घेतलं की, नेहमीच्या सवयीने मुखपृष्ठ पाहून आणि प्रस्तावना वगैरे वाचून झाली की, आपली नजर पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेकडे जाते. दोन शब्दांच्या एका वाक्यात असलेल्या किंवा कधीतरी अगदी मनापासून एक छोटी नोट लिहिलेली अर्पणपत्रिका वाचकाला सहज आवडून जाते. नुकतंच असं एक छान पुस्तक वाचून पूर्ण झालं आणि त्याची अर्पणपत्रिका ही आवडली. `द लाईटनिंग बर्ड’ या लायल वॉटसन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा अतिशय सुंदर अनुवाद निरंजन घाटे यांनी मराठीत `निसर्गपुत्र’ या नावाने केला आहे. पुस्तक तसं जुनंच म्हणजे 2002 साली प्रकाशित झालेलं. ही कथा आहे अँड्रियन बोशीयर यांची. निसर्गवेडाने झपाटलेला हा इंग्लिश मुलगा योगायोगाने आफ्रिकेत येतो आणि मग आयुष्यभर निसर्गाच्या अगम्यतेशी, मानवी उपांतीच्या आश्चर्यांशी आणि संस्कृतीच्या पाऊलखुणांशी एकरूप होऊन खऱया अर्थाने वनवासी होऊन राहतो. अँड्रियनच्या या भटकंतीला खरा अर्थ मिळाला तो जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. रेमंड डार्ट यांच्यामुळे! त्यांच्या मार्गदर्शनाखाली अँड्रियनचा रानप्रवास संशोधनाच्या दृष्टीने अधिक होऊ लागला. निसर्गाची आवड त्याला आफ्रिकेच्या अज्ञात जगाच्या शोधापर्यंत घेऊन जाते आणि पुढे मानववंश शास्त्रात त्याचं नाव मानाने घेतलं जातं. त्याच्या साहसाची ही सत्यकथा आहे.

अँड्रियन फक्त जंगलात हिंडला नाही, तर तिथल्या लोकांशी, समाज जीवनाशी एक होऊन राहिला. आफ्रिकेच्या जंगलात राहणाऱया सोथो आदिवासींची संस्कृती त्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकीकडे सगळ्या रूढीपरंपरेचे वहन करत असताना निसर्गशक्तींना सर्वोच्च मानत, जतन आणि पूजन करणं ही गोष्ट जगातील कोणत्याही आदिम संस्कृतीच्या जवळ जाणारे असल्याचं पुस्तक वाचताना सारखं जाणवत राहतं आणि मग अँड्रियनच्या रानवाटा ओळखीच्या वाटू लागतात.

साप पकडण्यात आणि त्याला काबूत ठेवण्यात अँड्रियन वाकबगार असतो. सुरुवातीच्या काळात आदिवासींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला या कौशल्याची फार मदत होते. पुढे त्याची ओळख `राडीनोगा’ म्हणजेच `सापाचा बाप’ अशी होते. अँड्रियन जसजसा या संस्कृतीच्या जवळ जातो तसतसा तो त्या संस्कृतीशी एकरूप होत जातो. या कामी त्याला आकडी येणे या आजाराचा फायदा वरदानासारखा होतो. आफ्रिकेतील काही जमातींमध्ये हे लक्षण म्हणजे पूर्वज अंगात येणं असं मानलं जातं. पण त्यासाठी गुरू करून काही विधी पूर्ण करावे लागतात. अँड्रियन `रासेबो’ नामक गुरू करून एका अपरिचित, पण तरीही परिचित झालेल्या संस्कृतीच्या गाभ्यात जाऊन बसतो. हे सर्व वाचत असताना एकाच वेळी ते गोष्टीरूप वाटतं आणि तरीही मानवी जीवनाचं एक अद्भुत अंग आपल्यासमोर उलगडत जातं.

एकदा दुष्काळी दिवसांत अँड्रियन पर्वतरांगेतून फिरताना त्याला एका गुहेत नगारे सापडतात. या नगाऱयांचा उपयोग पूर्वी पाऊस पडण्यासाठी केला जात असे. ब्रिटिशांनी स्वतच्या धर्मप्रसारासाठी स्वतची संस्कृती कशी इतरांवर लादली हे याच प्रकरणात वाचायला मिळतं आणि ते वाचताना त्यांचं दुःख समजून घेता येतं. नगाऱयांची कथा हळूहळू मुखिया उलगडत जातो. प्रत्येक कुटुंबाकडे नगाऱयासंबंधीची जबाबदारी पिढीजात असते, ते ती पुन्हा स्वीकारतात. गाव अशा पद्धतीने एकत्र बांधला जात होता हेही लक्षात येतं. पाऊस लवकर यावा यासाठी या नगाऱयांची कशी मदत होते हा प्रसंग पुस्तकातूनच वाचण्यासारखा आहे. या प्रसंगाने अँड्रियनचं प्रवासपा पूर्ण होतं असं मला वाटतं. अँड्रियनचा हा रानप्रवास नक्कीच आवडणारा आहे.

या पुस्तकाची अर्पणपत्रिका विशेष आहे. निसर्गाचा आणि संस्कृतीचा शोध घ्यायला निघालेल्या अँड्रियनची ही प्रवास कथा आणि निरंजन घाटय़ांनी केलेला अतिशय सुंदर अनुवाद! हे पुस्तक त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाला अर्पण केलंय. महाराष्ट्राचं हे लाडकं आराध्य दैवत! त्याची भक्ती करणारे हजारो लाखो वारकरी हे शेतातून-निसर्गातून त्याचा शोध घेत असतात. आपले वारकरी हे निसर्गाला जपणारे. वारीच्या रिंगणात भक्ती आहे तशी लोक संस्कृतीदेखील आहे. आपले वारकरी आणि आपणदेखील निसर्गाचेच उपासक. अँड्रियन बोशियरची निसर्ग भ्रमंतीची, खरं तर निसर्गाशी एकरूप होण्याची कथा घाटय़ांच्या सुंदर अर्पणपत्रिकेतून निसर्गालाच पुजणाऱया, मानणाऱया असंख्य महाराष्ट्रीयन लोकांची भक्ती-भावना जिथे एकरूप होते त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण होते. म्हणून या ओळी विशेष आवडल्या.

[email protected]

निसर्गपुत्र
मूळ लेखक ः लायल वॉटसन
अनुवाद ः निरंजन घाटे
प्रकाशक ः मेहता पब्लिशिंग हाऊस