पोलीस अधिकाऱ्याने आमदार नितेश राणेंची मस्ती उतरविली; मी असे लईजण बघितलेत, तुला काय करायचे ते कर

सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून पोलिसांना दमबाजीची भाषा करणारे भाजप आमदार नितेश राणे यांची मस्ती पोलीस अधिकाऱ्यानेच उतरविली. प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करू नका अशी नोटीस देण्यासाठी ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे हे आमदार राणेंकडे गेले तेव्हा त्यांनी पोलिसांना अरेतुरेची भाषा वापरली. त्यामुळे पोलीस निरीक्षक हारूगडे संतापले. ‘भाषा सांभाळून वापरा. मी असे लईजण बघितलेत. तुला काय करायचे ते कर’ असे प्रत्युत्तर देत हारूगडे यांनी राणेंची मस्ती उतरविली.

आमदार नितेश राणे हे हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी सांगलीतील ईश्वरपूर येथे आले होते. राणे यांच्या दौऱ्याला काही संघटनांचा विरोध होता. राणेंना प्रक्षोभक भाषणापासून रोखा अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनीही शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. सभेत प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करू नको अशी लेखी नोटीस राणेंना देण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय हारूगडे आपल्या सहकाऱयांसह शासकीय विश्रामगृहावर गेले. नोटीस पाहून नितेश राणेंनी अरेतुरेची भाषा केली. ‘तू कोणाला नोटीस देतोस? त्या मुस्लिमांना नोटीस दे जा. मी नोटीस घेत नाही. दे तिकडे फेकून’, अशी एकेरी भाषा राणेंनी पोलिसांना वापरली.

वरिष्ठांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल होईल – पोलीस निरीक्षक

प्रक्षोभक वक्तव्य करून समाजात जाणीवपूर्वक कोणी तेढ निर्माण करत असेल तर त्याला सूचना करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडायला गेलो होतो. ज्यांनी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्यावर वरिष्ठांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.

पोलीस निरीक्षक हारूगडे यांनी सुनावले

राणेंची एकेरी भाषा ऐकून पोलीस निरीक्षक हारूगडे हेही आक्रमक झाले. ‘भाषा सांभाळून वापरा. मी पण असे लईजण बघितलेत. मी नोकरीची पर्वा करत नाही. तुला काय करायचे ते कर’ असे हारूगडे यांनी राणेंना सुनावले. त्यानंतर पुन्हा शाब्दीक बाचाबाची होऊन वातावरण तणावपूर्ण बनले होते. तेथे उपस्थितीत लोकांनी मध्यस्थी केली. आमदार राणेंनी नोटीस स्विकारली नाही. अन्य वक्त्यांना नोटीस देऊन पोलीस परतले. मात्र, ईश्वरपूरमध्ये पोलीस निरीक्षक हारूगडे यांनी राणेंची मस्ती उतरविली याबद्दल चर्चा होत असून, समाधान व्यक्त होत आहे.