तारापोरवाला मत्स्यालय जागतिक दर्जाचे करणार, नव्या इमारतीसाठी आर्पिटेक्ट नियुक्त

चर्नी रोड परिसरात असलेल्या तारापोरवाला मत्स्यालयाशी प्रत्येकाच्या शाळेच्या आठवणी जोडलेल्या आहेत. हे मत्स्यालय तोडून त्याच जागी नव्याने जागतिक दर्जाचे बांधले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 350 कोटी रुपये खर्च करणार आहे. न्यूझीलंडचे आर्पिटेक्ट त्यासाठी नेमलेले आहेत. एक ते दीड वर्षात त्याच जागी जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभे करणार आहोत. ते पाहण्यासाठी जगातले पर्यटक आले पाहिजे, या दृष्टीने वाटचाल सुरू आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी दिली.

विधान परिषदेत नितेश राणे यांनी 260 च्या प्रस्तावावर उत्तर दिले. सदस्य मनीषा कायंदे यांनी तारापोरवाला मत्स्यालय आणि कोकणात जाणारी रो रो सेवा  कधी सुरू होणार, याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर नितेश राणे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, पुढील दहा दिवसांत रो रो सेवा सुरू करणार आहे. एम टू एम रो रो सेवा सुरू करणार आहोत. कोकणात जाताना तिकिटांची समस्या असते, मात्र या सेवेमुळे वेळ आणि पैसा वाचणार आहे. रत्नागिरी ते माझगाव आणि माझगाव ते विजयदुर्ग असा गाडीसह प्रवास चार तासांत करता येणार आहे. सर्वांनी कोकणात येताना या सेवेचा वापर करावा, असे आवाहन मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी केले. त्याचबरोबर मच्छीमारांनाही 100 टक्के डिझेल परतावा लवकरच देऊ, असे आश्वासन राणे यांनी दिले.