कामात बेईमानी करू नका, मागे लागलो तर सोडणार नाही; नितीन गडकरी यांची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तंबी

नालेसफाई वेळेवर आणि योग्य प्रकारे झाली नसती तर नागपूर शहरात पावसामुळे पाणी साचले नसते, कामात बेईमानी कराल तर याद राखा, मी मागे लागलो तर सोडणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आज खडसावले. नागपूरसारख्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचतेच कसे? नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का? असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

नागपूरमधील विकासकामांचा आढावा व प्रामुख्याने कामठी येथे ड्रगन पॅलेस मेट्रो स्टेशन उभारण्याच्या विषयावर नियोजन भवन येथे बैठक झाली. त्या बैठकीत नितीन गडकरी उपस्थित होते. मेट्रोसाठी शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत तसेच शहरातील अन्य रस्ते योजनांबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी गडकरी यांनी नागपूर शहरात पावसामुळे साचलेल्या पाण्याबाबत अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. सात दिवसांत शहरात झालेल्या नुकसानीचा स्पॉट ऑडिट करून अहवाल सादर करा, असे आदेश त्यांनी दिले. जाणीवपूर्वक कामात बेईमानी करणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, सुलेखा कुंभारे तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.