
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांची भाषणं त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहतात. नुकतेच त्यांनी दिल्लीत जाणं आवडत नसल्याचं विधान केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे.
मंगळवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी विधान केलं की, दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेमुळे शहरात वेळ अधिक काळ थांबण्यातील एक प्रमुख अडथळा आहे.
‘दरवेळी दिल्लीत येताना मला वाटतं की मी जावं की नाही. इतकं भयंकर प्रदूषण आहे’, असं गडकरी म्हणाले.
हवेच्या गुणवत्तेत घसरण झाल्यामुळे, वाढलेल्या प्रदूषणामुळे ते आजारी पडतात. त्यामुळेच त्यांच्या मनात वारंवार दिल्लीत जावं की नाही असा विचार येतो.
‘मला इथे राहायला आवडत नाही. इथल्या प्रदूषणामुळे मला संसर्ग होतो. इथे येण्यापूर्वी मला दोन तास प्राणायाम करावा लागला’, असेही ते म्हणाले.
गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत, त्यांनी यावेळी आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांवर भाष्य केलं आणि प्रदूषणाचा सामना करण्यासाठी पर्यायी ऊर्जा स्त्रोतांकडे वळण्याची सूचना देखील केली.
‘पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देऊन आपण जीवाश्म इंधनाची आयात कमी करू शकतो’, असंही ते म्हणाले. हिंदुस्थान जीवाश्म इंधनाच्या आयातीवर दरवर्षी 22 लाख कोटी रुपये खर्च करत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, या आठवड्यात दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा दिसून आली आहे. गुरुवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 165 वर नोंदवला गेला, जो बुधवारी 178 वर होता.