मोफत योजनांच्या भरवशावर राजकारण करता येत नाही; लाडकी बहीण योजनेवरून गडकरींचे खडे बोल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण तसेच अनेक खिरापती वाटणाऱ्या योजनांची खैरात करण्यात येत आहे; परंतु या रेवडी संस्कृतीवरून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिंधे सरकारला आरसा दाखवला आहे. मोफत योजनांच्या भरवशावर राजकारण करता येत नाही. रेवडी संस्कृती देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वर्षांआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील ‘आप’ सरकारवर निशाणा साधत ‘रेवडी संस्कृती’ देशासाठी धोकादायक असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच त्याचे गंभीर आर्थिक परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. सवलतींच्या योजनांमुळे 18 लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात मोफत वीज दिली तर हे क्षेत्र धोक्यात येईल, असे पंतप्रधानांनी म्हटले होते.  त्याचा उल्लेख करत गडकरींनी मतप्रदर्शन केले.

नेमके काय म्हणाले गडकरी?

मिक्सर, इडली पात्र अशा वस्तू सरकारने फुकट वाटल्याने राजकारण होत नाही. त्यासाठी आम्हाला रोजगार निर्माण करावे लागेल, गरीबांना घर बांधून द्यावे लागेल, स्वच्छ भारत बनवावा लागेल, नवीन उद्योग आणावे लागतील, असेही गडकरी यांनी व्हिडीओत म्हटले आहे. अशा कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी केवळ ‘रेवडी’ वाटल्याने देशाचे आणि आर्थिक स्थितीचे नुकसान होईल. मोफत वस्तू मिळाली तर लोकांना त्याचे महत्त्व राहत नाही. जेथे आवश्यक आहे तेथे सवलती द्यायला हव्यात, मात्र सध्या सुरू असलेले राजकारण मान्य नाही, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.