Delhi bomb blast – चारही दहशतवादी डॉक्टरांची प्रॅक्टिस कायमची बंद, NMC ने रजिस्टरमधून नावेही हटवली

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटामागे एक नाही तर अनेक डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली, तर चौथ्या डॉक्टरने आत्मघातकी हल्ला केला. या सर्वांवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आता नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) ने मोठी कारवाई केली आहे. एनएमसीने आरोपी डॉक्टरांची नावे अधिकृत नोंदणी अर्थात रजिस्टरमधून हटवली आहेत, त्यामुळे त्यांना भविष्यात वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही.

जम्मू-काश्मीर मेडिकल कौन्सिलच्या आदेशानंतर नॅशनल मेडिकल कमिशनने आरोपी डॉक्टर मुजफ्फर अहमद, डॉक्टर आदिल अहमद राथर, डॉक्टर मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन सईद यांची नावे नॅशनल मेडिकल रजिस्टरमधून काढून टाकली आहेत.

दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर तपास यंत्रणांनी गोळा केलेल्या पुराव्यानुसार घटनेत या डॉक्टरांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. आता त्यांची नावेही रजिस्टरमधून काढून टाकण्यात आली असून आयोग आणि जम्मू-कश्मीर मेडिकल कौन्सिलच्या पुढील आदेशापर्यंत हे डॉक्टर प्रॅक्टिस करू शकणार नाहीत. तसेच दिल्ली स्फोटात सहभागी असलेले हे डॉक्टर न्यायालयामध्ये दोषी सिद्ध झाल्यास ते आयुष्यात कधीही वैद्यकीय व्यवसाय करू शकणार नाहीत.

दरम्यान, 10 नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ शक्तिशाली बॉम्ब स्फोट झाला होता. यात 13 जणांचा मृत्यू झाला होता. हा स्फोट होण्याआधी तपास यंत्रणांनी 2900 किलो स्फोटके जप्त केली होती. या प्रकरणी सदर डॉक्टरांसह 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.