
राष्ट्रीय महामार्गावरून वारंवार प्रवास करणाऱ्या आणि वार्षिक टोल पास वापरणाऱ्या प्रवाशांच्या खिशावरचा भार वाढणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावर मिळणारा वार्षिक टोल पास महाग होणार आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) वार्षिक टोल पासच्या किमतीत वाढ केली आहे. आता 1 एप्रिलपासून वाहनधारकांना या पाससाठी 3,000 रुपयांऐवजी 3,075 रुपये मोजावे लागणार आहेत.
टोल दरांमध्ये किरकोळ वाढ
नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना 1 एप्रिल 2026 पासून नवीन दर लागू करण्याचे आणि याची माहिती प्रवासी व इतर भागधारकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, टोल दरांचा दरवर्षी आढावा घेऊन त्यात सुधारणा केली जाते. याच प्रक्रियेअंतर्गत यंदा वार्षिक पासच्या किमतीत किरकोळ वाढ करण्यात आली आहे.
वार्षिक टोल पासचे हे नवीन दर आर्थिक वर्ष 2026-27 साठी लागू होतील. हा पास केवळ खासगी वाहनांसाठीच उपलब्ध असतो आणि यासाठी वाहनामध्ये ‘ऑक्टिव्ह फास्टॅग’ असणे अनिवार्य आहे. वार्षिक टोल पास हा एक वर्षासाठी किंवा 200 वेळा टोल ओलांडण्यासाठी वैध असतो.
























































