कलकत्तावाला चाळीवर तूर्तास कारवाई नाही! नयानगर झोपडीधारकांना वाढीव भाडे मिळणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

दादरच्या सिद्धिविनायक मंदिराजवळील कलकत्तावाला चाळीवर 13 जूनपर्यंत कोणतीही तोडक कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर या चाळीच्या पुनर्विकासाबाबत तोडगा काढण्यासाठी एसआरएचे सीईओ, विकासक, रहिवासी तसेच शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई लवकरच एकत्रितपणे बैठक घेणार आहेत. दरम्यान, माहीमच्या नयानगर झोपडपट्टी पुनर्विकासाअंतर्गत घरभाडे आठ हजारांनी वाढवून ते 20 हजार केल्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेने यासाठी पाठपुरावा केला होता.

मुंबईतील दादर येथे असलेल्या कलकत्तावाला चाळ आणि माहीममधील नयानगर झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास गेली अनेक वर्षे रखडला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना नेते- खासदार अनिल देसाई यांनी आज कलकत्तावाला चाळ आणि नयानगर झोपडीधारकांची बैठक शिवसेना भवन येथे घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. बैठकीत कलकत्तावाला चाळ, नयानगर या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत गेली अनेक वर्षे होत असलेल्या रहिवाशांवरील अन्यायाविरुद्ध अनिल देसाई यांनी कल्याणकर यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. कलकत्तावाला चाळीवरील तोडक कारवाई 13 जूनपर्यंत करणार नाही तसेच नयानगरमधील झोपडीधारकांचे भाडे वाढवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, उपसचिव प्रवीण महाले, विभागप्रमुख महेश सावंत, महिला विभाग संघटिका श्रद्धा जाधव, शाखाप्रमुख अजित कदम आदी उपस्थित होते.