
पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीवरून महायुती सरकारवर टीका होत असतानाच ही तिसरी भाषा शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या पहिल्याच टप्प्यावर विद्यार्थ्यांसमोर संकट उभे राहणार आहे. यावर उपाय म्हणून 20 पटसंख्या असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांची व्हिडियोवर शिकवणी घ्यायची सक्ती आता सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीनंतर एका तिसऱ्या भाषेतून शिक्षण घेण्याचे बंधन घातले आहे. पण तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा थोपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि विद्यार्थ्यांनी हिंदीव्यतिरिक्त अन्य भाषेचा पर्याय निवडला तर त्यासाठी शिक्षकच नाहीत. म्हणून बालभारती व्हिडियोचा आधार घेऊन अशा विद्यार्थ्यांना तिसऱया भाषेचे धडे दिले जाणार असल्याचे समजते. पहिलीतील विद्यार्थ्यांना असे ऑनलाईन धडे देणे यशस्वी होणारच नाही, असे शिक्षणतज्ञांचे म्हणणे आहे. तरीसुद्धा सरकार अडून बसल्याने एक प्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसानच होणार आहे.
कंत्राटी शिक्षक नेमणार
तिसरी भाषा शिकवण्यासाठी त्या माध्यमाचे शिक्षक उपलब्ध न झाल्यास पंत्राटी तत्त्वावर शिक्षक घ्यायची तयारीही शिक्षण विभागाकडून सुरू आहे. सध्या तमीळ, तेलुगू, उर्दू, कन्नड माध्यमातून डी.एड.-बी.एड. झालेल्या शिक्षकांची संख्या अत्यल्प आहे. ती कमतरता या कंत्राटी शिक्षकांच्या माध्यमातून भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
– तिसरी भाषा शिकणे अनिवार्य असले तरी शाळा सुरू होऊन आठवडा होत आला तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी तिसरा विषय निवडलेला नाही. त्यातच तिसऱया भाषेची पुस्तकेच उपलब्ध नाहीत, मग तिसरा विषय विद्यार्थी कसे शिकणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.


























































