
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अजित दादांनी आपल्याच नेत्यांसोबत कुठलीही चर्चा केली नव्हती अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच याबाबत जयंत पाटील यांनी आपल्याला माहिती दिली होती असेही मुश्रीफ म्हणाले.
एबीपी माझासोबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या विषयावर आधीच खुलासा करत खंडन केले आहे. जयंत पाटील यांनी काही बैठका झाल्याचे सांगितले असले तरी, त्या बैठका केवळ नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या विश्लेषणापुरत्याच मर्यादित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांसोबत अशी कोणतीही औपचारिक बैठक झालेली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“या सर्व प्रक्रियेला भारतीय जनता पक्षाची किंवा एनडीएतील घटक पक्षांची संमती होती की नाही, याबाबतही काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे,” असे मुश्रीफ म्हणाले.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत झालेल्या टीका-टिप्पण्यांवर बोलताना ते म्हणाले की, पवार कुटुंब हे पुरोगामी विचारांचे कुटुंब आहे. अंत्यसंस्कार व संबंधित विधी तीन दिवसांत पूर्ण करून तिसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. यामागचा उद्देश सत्ता किंवा पद नसून, अजित पवारांनंतर पोरके झालेल्या कार्यकर्त्यांना मानसिक आधार देणे आणि ‘तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ हा संदेश देणे हाच होता, असे त्यांनी सांगितले.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध ठेवणे, पक्ष वाढवणे आणि दादांमुळे अनाथ झालेल्या कार्यकर्त्यांना बळ देणे हाच या सगळ्यामागचा खरा हेतू आहे,” असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.























































