
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्रायल संघर्षाने फक्त राजकारण ढवळून निघाले नाही. तर अनेकांच्या भावना देखील या युद्धासोबत जोडल्या गेल्या आहेत. ईदसारखा पवित्र सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. परंतु विमान तिकीटांचे वाढते दर, यामुळे आखाती देशांत काम करणारे अनेक हिंदुस्थानी घरी परतण्याऐवजी परदेशातच अडकून पडले आहेत. महिन्यांपूर्वीच ईदसाठी हिंदुस्थानात परतण्याची तयारी करणाऱ्या, सर्वांचेच नियोजन एका क्षणात कोलमडले. फ्लाइट्स रद्द झाल्या, तिकीटांचे दर गगनाला भिडले आणि उपलब्ध सीट्स मिळेनाश्या झाल्या आहेत.
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे हवाई क्षेत्र वारंवार बंद करण्यात येत आहे. परिणामी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे ही रद्द करण्यात आली आहेत. केवळ इतकेच नाही तर, दुबईसारख्या मोठ्या एअरपोर्टवरही आता गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांचा परीणाम म्हणजे पर्यायी मार्गांमुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च हे दोन्ही वाढले आहेत. विमान इंधनाच्या वाढत्या किमती आणि अनिश्चिततेमुळे तिकीटांचे दर दुप्पट-तिप्पट झाले आहेत. सामान्य कामगारांसाठी हा खर्च परवडण्याच्या पलिकडे गेला आहे. त्यामुळेच आता ईद साठी हिंदुस्थानात परत येणं हे स्वप्न अनेकांसाठी राहिले आहे.
आखाती देशांमध्ये सद्यस्थिती ही अतिशय भयंकर असून, क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या शक्यतेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही भागात आपत्कालीन इशाऱ्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. त्यामुळेच आता हजारो हिंदुस्थानींच्या मनात केवळ एकच प्रश्न आहे. आता ईदला हिंदुस्थानात म्हणजेच आपल्या घरी जाता येणार नाही.



























































