महिला खेळाडूंसाठी मैदानात स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम उभारणार, सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यभरातील मैदानांमध्ये स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम नसल्यामुळे महिला खेळाडूंना समस्यांचा सामना करावा लागतो. या मुद्दय़ावर संयुक्त बैठक घेऊन तत्काळ निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेसह सर्वपक्षीय आमदारांनी विधान परिषदेत केली. त्यावर अधिवेशन संपण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, विधी विभाग, महापालिका, विविध संस्थांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

राज्यातील विशेषतः मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान, माटुंगा मैदान, शिवाजी पार्प, ओव्हल मैदान येथे महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमचा अभाव आहे. वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याकडे शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून लक्ष वेधले. त्यावर राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, लोकायुक्तांच्या निर्देशानुसार, अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमली आहे. हे पथक सर्व मैदानांचे गुगल मॅपिंग करून सुविधांचा आढावा घेणार आहे. नियमानुसार, 2 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा मैदानांवर स्वच्छतागृह बंधनकारक आहे; ओव्हल मैदानासंदर्भात असलेल्या सुप्रिम कोर्टाच्या निकालामुळे इतर मैदानांवर कायमस्वरूपी बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या मैदानांवर पंटेनरच्या माध्यमातून तात्पुरते स्वच्छतागृह, चेंजिंग रूम उभारण्याचा पर्याय विचारात घ्यावा, असे निर्देश एसआयटीला दिल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई ही खेळाडूंची फॅक्टरी, पण…

मुंबई ही खेळाडूंची फॅक्टरी आहे. या विषयावर नेहमी चर्चा होतात, पण तोडगा निघत नसल्यामुळे खेळाडू सोयीसुविधांपासून वंचित राहतात. त्यामुळे ओव्हल मैदानाबाबतचा निर्णय इतर मैदानाला लागू होतो का हे आधी तपासले पाहिजे याकडे आमदार अनिल परब यांनी लक्ष वेधले.