Baba Siddqiue Murder – बाबा सिद्दीकींना Y सुरक्षा नव्हतीच, तीन कॉन्स्टेबलची सुरक्षा असताना घटनेच्या वेळी एकच कर्मचारी होता उपस्थित

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आज पत्रकार परिषद घेतली. बाबा सिद्दीकी यांना Y दर्जाची सुरक्षा नव्हतीच. त्यांच्या सुरक्षेसाठी तीन कॉन्स्टेबल तैनात होते. पण जेव्हा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा एकच पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नलावडे म्हणाले की घटनास्थळी तीन आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. यातील तिसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. सर्व आरोपींची ओळख पटली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

 

तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी 15 पोलीस पथकं स्थापन केली असून त्यांना वेगवेगळ्या राज्यात पाठवले आहे. बाबा सिद्दीकी यांची 9 ते साडे नऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांना Y दर्जाची सिक्युरिटी नव्हती. पण त्यांच्या सुरक्षेसाठी तीन कॉन्स्टेबल देण्यात आले होते. तसेच जेव्हा घटना घडली तेव्हा एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होता.

या आरोपींचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध होता का, हे आरोपी अल्पवयीन आहेत का, एसआरए प्रकरणी ही हत्या झाली आहे का या सर्व अंगाने पोलीस चौकशी करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.