शांतता नव्हे तर राजकारणाला महत्त्व दिले, ट्रम्प यांना नोबेल न मिळाल्याने अमेरिकेचा जळफळाट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार मिळाला नाही. ट्रम्प स्वतःला या पुरस्काराचा सर्वात मोठा दावेदार मानत होते, पण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, नोबेल समितीने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की त्यांना शांततेपेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व आहे. जगभरातील अनेक युद्ध आपण थांबवली त्यामुळे शांततेचा नोबेल आपल्यालाच मिळावा असा दावा ट्रम्प यांनी केला होता.

व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर स्टीव्हन च्युंग यांनी म्हटले की, नोबेल समितीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मात्र, अध्यक्ष ट्रम्प शांततेसाठी प्रयत्न करत राहतील, युद्ध संपवण्याचे काम सुरू ठेवतील आणि जीव वाचवण्याचे कार्य करतील. ते मानवतावादी भावना असलेले व्यक्ती आहेत असे च्युंग म्हणाले.

ट्रम्प यांनी सार्वजनिकपणे अनेक वेळा सांगितले आहे की त्यांनी सात युद्ध थांबवली आहेत आणि आता रशिया-युक्रेनचे युद्ध संपवून आठवे युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नात आहेत. पाकिस्तान आणि इस्रायलसारख्या देशांनीही नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची शिफारस केली होती.

नॉर्वेच्या नोबेल समितीने 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना देण्याची घोषणा केली आहे. गेली 20 वर्षे मारिया व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांसाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे शांततापूर्ण संक्रमणासाठी लढा देत आहेत.

नोबेल समितीने पुरस्कार जाहीर करताना म्हटले की, आज जेव्हा जगातील अनेक भागांमध्ये हुकूमशाही वाढत आहे आणि लोकशाही दुर्बल होत आहे, अशा काळात मारिया मचाडो यांसारख्या लोकांचे धैर्य हे आशेचा किरण आहे.