हिंदुस्थानी वंशाचे नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी पत्नीसह अमेरिका सोडणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

हिंदुस्थानी वंशाचे नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी पत्नीसह अमेरिका सोडणार आहेत. अभिजीत बॅनर्जी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूटमध्ये काम करतात. पत्नी एस्थर डुफ्लो यांच्यासह ते लवकरच झुरिच विद्यापीठात काम करण्यासाठी जाणार आहेत. बॅनर्जी दांपत्यांच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून यामागे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाचा हात असल्याची चर्चा आहे.

झुरिच विद्यापीठात अर्थशास्त्रासाठी एक नवीन केंद्र स्थापन करणार असल्याचे विद्यापीठाने शुक्रवारी जाहीर केले. झुरिच विद्यापीठाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, पुढील वर्षी जुलैपासून नोबेल विजेते जोडपे त्यांच्या अर्थशास्त्र विद्याशाखेत सामील होतील. जगातील दोन सर्वात प्रभावशाली अर्थशास्त्रज्ञ झुरिचमध्ये सामील होत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे, असे विद्यापीठाचे अध्यक्ष मायकेल शेपमन यांनी सांगितले. ‘जागतिक गरिबी दूर करण्यासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ यासाठी अभिजीत बॅनर्जी आणि त्यांची पत्नी एस्थर डुफ्लो यांना मायकेल व्रेमर यांच्याबरोबर 2019 साली अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला होता. झुरिच विद्यापीठाने निवेदनानुसार एस्थर डुफ्लो आणि त्यांचे पती अभिजीत बॅनर्जी यांना लेमन फाऊंडेशनचा निधी मिळालेल्या झुरिच विद्यापीठात मान्यताप्राप्त प्राध्यापकपद दिले जाईल.

 अमेरिका सोडण्याचे कारण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संशोधन निधीतील केलेली कपात आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यांवर केलेले हल्ले यामुळे अमेरिकेची बौद्धिक संपदा देशाच्या बाहेर जाऊ शकते, असा इशारा तज्ञांतर्फे देण्यात आला होता. याचाच एक भाग म्हणून आता इतर देश अमेरिकेतील प्रज्ञावंतांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.